
विद्या देशमुख
ग्रीनव्हील , साऊथ कॅरोलिना
घराकडे जाणाऱ्या त्या पायवाटेच्या दोन्ही बाजूंना असलेली बाग पहात पहात पुढे जाण्यात एक अवर्णनीय आनंद वाटे.
श्रावणात पहाटेस पारिजातकाच्या फुलांनी ती पायवाट भरून जायची. एक मंद सुगंध पहाटेच्या गारव्यात मिळून जात असे
आणि ती बाग एका स्वर्गीय पावित्र्याने भरून जात असे. फुलांच्या सड्यात शांतपणे उभ्या असलेल्या पारिजातकाच्या
सान्निध्यात रहाण्याचा अवर्णनीय आनंद ह्या बागेतच मला मिळाला…”पारिजात की हास्य शिवाचे भूमीवर निखळे“ ही दैवी
अनुभूती केवळ इथेच मला लाभली..
तर असा तो बागेच्या दाराशी असलेला पारिजात..मनाचा एक कोपरा आठवणींच्या सुगंधाने सदैव दरवळत ठेवणारा…
डावीकडे पारिजातकासमोर लाल जास्वंद आणि तिच्यामागे पानापानांत बहरलेली दुहेरी तगर..जास्वंद आणि तगर वर्षाचे
बाराही महिने फुलत असत.
त्यांच्या मागे एका कोपर्यात सोनचाफ्याचे झाड आईने अगदी कौतुकाने लावले होते.त्या चाफ्याचे एखादे फूलही लगेच एका
लहानशा पाण्याने भरलेल्या गडूवर आपल्या एकदोन पानांसह मोठ्या एेटीत विराजमान होत असे.
डावीकडे थोडे पुढे तुळशीची जागा होती. तिथे कायम कृष्णतुळस डवरलेली असे. उन्हाळ्यात मंजिर्या सुकून जमिनीवर पडत
आणि पावसाळ्याच्या सुरवातीस नवी रोपे आजूबाजूला उगवत असत.आई त्यांना जपून वाढवत असे .
उजवीकडे एक नाजूकसे डाळींबाचे झाड होते.डाळींबे लागली आणि ती मोठी होऊ लागली की त्यांच्या वजनाने फांद्या खाली
वाकत..फळ फार मोठे नव्हते पण ते झाडावरच पिकत असे. पिकून त्याला तडा गेल्यावरच ते काढले की फार सुंदर , डाळींबी
रंगाचे गोड दाणे त्यातून निघत. त्यांची आंबट-गोड किंचित तुरट चव अजूनही जिभेवर रेंगाळते आहे.कितीतरी वर्षे ती फळे
आम्ही सर्वांनी , नातलगांनी आणि अगदी आई-आप्पांच्या नातवंडांनीही खाल्ली.
ह्या झाडाशेजारीच दुसरे एक झाड डाळींबाच्या नुसत्या फुलांचेच होते.गर्द अबोली-शेंदरी रंगाची ही फुले फार सुंदर दिसत.
देवगडच्या हापूस आंब्याचे एक कलम आईने खास मागवले होते .त्या आंब्याचे फळ फारच मोठे आणि सुमधुर होते.
उन्हाळ्याच्या सुट्टीत आजोळी आलेली नातवंडे सकाळचे आठ-साडेआठ वाजले तरी उठायला तयार नसत. मग आप्पा हसत
हसत म्हणत “चला आंबे खायला…” आणि काय गंमत! पटापट सगळी मंडळी उड्या मारून बिछान्याबाहेर येत आणि भराभर
तोंडे धुवून स्वैपाकघरात पळत.
त्यानंतरचे दृष्य फारच नयनरम्य असे..एक मोठ्ठे ताट पुढे घेवून आई विळीवर आंबे कापत आहे आणि बच्चे मंडळी त्या
ताटाभोवती बसून मनसोक्त आंबे खात आहेत…अजूनही ते चित्र डोळ्यांपुढे तरळत आहे..
आज ही नातवंडे मोठी होवून आपआपल्या संसारात रमली आहेत पण त्यांच्यासाठी बालपणचा हा आनंद “विसरू म्हणता
विसरेना..” अशा प्रकारच्या आठवणीं मधला एक ठेवा बनून राहिला आहे..
ह्या झाडाच्या बाजूलाच होते सीताफळाचे झाड.ह्या झाडालाही भरपूर फळे येत. झाडावरच पिकलेले सीताफळ अतिशय मधूर
लागे.
बागेच्या एका कडेला असलेल्या आंबा ,सीताफळ , पेरु आणि कढीपत्ता ह्या झाडांपुढे बागेच्या आतील बाजूस बरीच फुलझाडे
दाटीवाटीने लावलेली होती. त्यात कुंद, पांढरा गुलाब,सोनटक्का, कवठी चाफा, ब्रम्हकमळ, अबोली, लाल गुलाब इ. झाडे
होती.कवठी चाफ्याचे फूल फुलू लागले की असा काही सुगंध दरवळायचा बागेत.!तसेच ब्रम्हकमळाचे ते अप्रतीम सुंदर असे
फूल पहाण्यासाठी कितीतरीजण बागेत येऊन जात असत.
त्याच्या समोरचे लिंबाचे झाड म्हणजे त्या बागेची शानच जणू! वर्षाचे बाराही महीने लिंबांनी भरलेले असे.
ह्या घरी आलेले पै-पाहुणे लिंबाचे सरबत न पिता कधीच घराबाहेर पडले नाहीत.त्या लिंबाला एक वेगळाच स्वाद होता आणि
प्रत्येकाला तो हवाहवासा वाटे.
इतरही अनेक झाडे त्या बागेत आलटपालटून फुलत . डावीकडे जसा घराच्या बाजूला पावसाळ्यानंतर सोनटक्का फुले तशाच
उजवीकडे उन्हाळ्याच्या सुरवातीला अबोली फुलत. लाल गुलाब,मोगरा, बटण- शेवंती,लिली, कर्दळी, गुलबक्षी आपआपल्या
परीने फुलत असत.
फळे, फुले, भाज्या इ. सर्व काही ह्या बागेकडून आम्हाला मिळाले ..पण सर्वात मोठी देणगी म्हणजे ह्या बागेमुळेच मातीवर
आणि मातीत उगवणार्या झाडाझुडुपांवर प्रेम करायला शिकलो आम्ही. मात्र त्यामागची खरी प्रेरणा ही आई-आप्पांची
होती..खरंच आई झाडांवर मनापासून प्रेम करत असे.एकदा तिने एक बोगनवेलीचे रोप बागेच्या कडेला लावले होते. पण त्या
बोगनवेलीचा रंग कसातरीच ,मातकट ब्राउनिश निघाला.कुणीतरी तिला ते झाड चांगले दिसत नाही म्हणून काढून टाकायला
सांगितले तर केवढा राग आला होता तिला! ती म्हणाली होती, “अरे! चांगलं दिसत नाही म्हणून लगेच काढून टाकायच का ते?
काही नाही काढायच ते ..”असं होत तिच झाडांवरच प्रेम…
तर अशी ही माझ्या माहेरच्या घरापुढची बाग. साधीसुधीच पण प्रेमाने जोपासलेली! एक शांत तृप्ती त्या झाडांवर पसरलेली
होती..त्या बागेत एक पावित्र्य नांदत होते..
घरापुढच्या ह्या बागेतूनच आम्हाला हेही कळले की प्रेम कसे रुजवायचे ….कशी काळजी घ्यायची असते सगळ्यांची …आणि
एकदा जोडली गेलेली माणसे सुध्दा कधीच तोडायची नसतात ते…..